दहा लाखांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच केले घरमालकाचे अपहरण मात्र…!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच मध्यरात्रीस घरमालकाच्या घरात घुसून त्याचे हात पाय बांधुन व मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. पोलिसांनी दोन तासातच दोन आरोपींना जेरबंद केले.

या प्रकरणी तिघांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी की, घरमालक कृष्णा अशोक साळुंके वय२३ वर्ष, हा दि.१९ रोजी रात्री आपल्या घरी झोपला होता.

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात दोन व्यक्तींनी वाजवला या वेळी दीड वर्षापासुन त्यांच्या घरातील रुममध्ये भाड्याने रहणाऱ्या योगेश शहादेव शिंदे याने गेटचा दरवाजा उघडला या नंतर दोघांनी घरात येऊन हात पाय बांधुन,

तोंडाला रूमाल बांधुन आणि चिकटपट्टी लावून गळ्याला चाकू लावून एमएच १२ एफके ३८९७ या चारचाकी वाहनात मागच्या सिटवर बसवुन म्हणाले की, कृष्णा याने दहा लाख रूपये दिले नाही तर त्यास ठार मारून टाकू. हे सर्व फिर्यादी कृष्णा याने गाडीत ऐकले होते.

त्याने कसेतरी गाडीतून आपली सुटका करुन घेतली व बीड रोडवरील आपल्या घराजवळ आरडाओरड केली. मात्र तरी देखील भाड्याने रहात आसलेल्या आरोपी योगेश शिंदे यांने फिर्यादी घरमालकास दम दिला की तू गाडीत येऊन बस नाहीतर तुझ्या आईला ठार मारु.

या नंतर शेजारी रहाणारे लोक धावत बाहेर आले त्या मुळे आरोपी योगेश शिंदे रा.सौताडा ता. पाटोदा जिल्हा बीड व त्याचे दोन साथीदार घटनास्थळाहुन पळुन गेले. या प्रकरणी कृष्णा साळुंके याने दिलेल्या फिर्यादीवरून एकुण तीन आरोपींविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना नागेश शाळेच्या पाठीमागील भागातील एका घरातून अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe