काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- रेशन दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात नेऊन तो चढ्या भावाने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीस कर्जत पोलिसांनी जेरबंद केले असल्याची घटना नुकतीच घडली आहे. अमोल जयसिंगकर (रा.देशमुखवाडी ता.कर्जत)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत कर्जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, (दि.१९ रोजी) राशीन-करमाळा रस्त्यावर कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास बोलेरो कंपनीची (एम.एच.४२ ए.क्यू. ६१५७) ही पिक-अप पोलिसांना संशयित आढळून आली.पोलिसांना या वाहनात प्रत्येकी ५० किलो वजनाच्या व १० हजार किमतीच्या सुमारे १० गोण्या हाती लागल्या आहेत.

पोलिसांनी संबंधित तांदूळ व ५ लाख रु. किमतीची बोलेरो पिक-अप जप्त केली आहे. पो.काँ.शाहूराजे टिकते यांनी याबाबत फिर्याद दिली असुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता तांदळाची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कायदा कलम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पी.डी. अंधारे,पी. ए. हांचे,पो.ना.दिंडे आदींनी केली आहे.पुढील तपास पोलीस नाईक पी.डी.अंधारे हे करत आहेत.

असंख्य गोरगरीब कुटुंबांची उपजीवीका रेशन धान्यावर चालते.मात्र त्यांच्या तोंडातील घास काढून त्याची चढ्या भावात खुल्या बाजारात कुणी विक्री करत असेल तर अशा दलालांची मुळीच गय केली जाणार नाही.

असा प्रकार कुणाच्या निदर्शनास आल्यास नागरीकांनी तात्काळ कर्जत पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कर्जचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe