मला जो कोणी आडवा येईल त्याला जिवंत सोडणार नाही; वाळू तस्कराची महिला सरपंचांना धमकी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचांना जिवे मारण्याची धमकी तस्करांकडून देण्यात आल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.

यामुळे वाळूतस्करांची वाढती मुजोरी व गुंडगिरी कळून येत आहे. यामुळे तालुक्यात पोलीस प्रशासनाचा काही धाक उरला कि नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान याप्रकरणी महिला सरपंचांसह ग्रामस्थांनी राहुरी येथे तहसील कार्यालयात धाव घेतली.

वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. कोणाकडे तक्रार करायची करा, मला कोण आडवे येतो, ते बघून घेतो. जो आडवा येईल त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी वाळू तस्कराने महिला सरपंचांना दिली आहे.

घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाळू तस्कराने वाळू उपशासाठी लागणारी वाहने नदीपात्रात जाण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.

ते रस्ते ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी खणून बुजून टाकले. मात्र, गुरुवारी रात्री वाळू तस्कराने हे रस्ते पुन्हा तयार करून खुलेआम वाळू उपसा सुरू केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊन वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला.

त्यावर वाळू तस्कराने महिला सरपंचांसह सर्वांना शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, वाळू तस्कराच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात ग्रामस्थांचे सह्यानिशी निवेदन देण्यात आले असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe