मंत्र्यांच्या तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, नागरिक भीतीच्या छायेखाली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- संगमनेर शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. लहान मुलांवर हल्ले करण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोकाट कुत्री कळपाने फिरत असल्याने रात्री पादचाऱ्यांना फिरणे धोकादायक झाले आहे. या कुत्र्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

मात्र नगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष देत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.संगमनेर शहर व परिसरात अगोदरच मोकाट कुत्र्यांची संख्या भरपूर आहे.

नगरपालिका प्रशासनाने यापूर्वी अशा कुत्र्यांना पकडून त्यांची रवानगी अन्य ठिकाणी केली होती.असे असले तरी शहरात अद्यापही मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्रे फिरताना दिसत आहे.

या कुत्र्यांचा रात्री-बेरात्री नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कुत्र्यांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी आणखी शेकडो कुत्र्यांची भर पडली आहे. या कुत्र्यांपासून नागरिकाला मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झाला आहे.

हे कुत्रे संगमनेरात कोणी आणले याबाबत पालिका प्रशासनाने कोणतीही माहिती घेतलेली नाही. संगमनेर शहरात हे कुत्रे कुणी आणून सोडले याचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

संगमनेर नगरपालिका प्रशासनानेही शहरात फिरणार्‍या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व शहरात कुत्रे सोडणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe