अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी हे सांड तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल असल्याचं विधान केलं होतं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उदाहरण देत असल्याचं सांगितलं होतं.
त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. तर, त्याच वेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
रत्नागिरी येथे त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलं. दरम्यान, भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली असून त्यातून त्यांची विकृती दिसून येते.
दानवे गुरूजींची बुद्धी भ्रष्ट झाली असून त्यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशा शब्दात त्यांनी यावेळी रावसाहेब दानवेंना लक्ष्य केलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. पण, यावेळी त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेवर होणार नाही.
नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला काहीही अर्थ नाही. उलट राणे कोकणात तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत. अशा रितीनं आशीर्वाद यात्रा काढून कोकणात शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही.
कोकणात काल देखील शिवसेना होती. आज देखील आहे. तसेच ती उद्या देखील राहणार असं म्हणत त्यांनी राणेंच्या यात्रेला गंभीरपणे घेण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम