अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- लोकप्रतिनिधींविरुद्धची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या पारनेर तहसीलच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडू लागली आहे.
देवरेंच्या क्लिपप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीसमोर आजपासून सुनावणी होणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची स्वत:च्या आवाजातील ११ मिनिटांची क्लिप समाज माध्यमांवर प्रसारित झाली.
या क्लिपमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यावर आरोप करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. देवरे यांनी महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. क्लिप प्रसारित झाल्यानंतर महिला आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तीन सदस्यांची समिती नियुक्त केली.
त्यामध्ये उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ या समितीच्या अध्यक्षा असून उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार वैशाली आव्हाड या समितीच्या सदस्या आहेत.
तहसीलदार देवरे यांना होणाऱ्या प्रशासकीय व मानसिक त्रासाची चौकशी करावी, असे या समितीला आदेश दिलेले आहेत. तसेच तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेला आहे. त्यामुळे देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणी पुढे काय होणार यासह सर्वाना उत्सुकता लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम