अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वाळू तस्करी करत असल्याचा धक्कादायक उल्लेख पारनेर तहसीलदारांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
हे शिक्षक तीन वर्षात कधीही शाळेवर गेले नाहीत. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली आहे. जिल्हा गौण खनिज अधिकारी व लिपिक यांना भाळवणी कोविड सेंटरमध्ये झालेल्या मारहाणीत या शिक्षकांचाही समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हे प्राथमिक शिक्षक शालेय कामकाज करत नाही, याची माहिती पारनेरचे गटविकास अधिकाऱ्यांना असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई ते करत नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांसमोर लोकप्रतिनिधी कायदा हातात घेतात.
हा प्रकार महिला तहसीलदारांना तणावाखाली ठेवणारा असून याची चौकशी होऊन पोलिस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी देवरे यांनी या तक्रारीत केली आहे.
प्रांत अधिकारी सुधाकर भाेसले यांच्यामार्फत तहसीलदारांवर खोट्या अॅट्रॉसिटीचा दबाव आणण्यात आला. कार्यालयातील काही लिपिक लोकप्रतिनिधींना तहसीलदाराची माहिती पुरवितात.
तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांविरोधात तक्रार अर्ज दिले आहेत. हा तक्रार अर्ज देणाऱ्यांमध्येही आणखी एका प्राथमिक शिक्षकांच्या नावाचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. हे शिक्षक शिस्तभंग विषयक वर्तन करत ते कधीही शालेय गावात राहत नसल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम