अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन करून कारखाना व्यवस्थापनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याची तयारी करत असल्याची माहिती संचालक मंडळाला समजताच कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांच्यासह संचालक मंडळ उपोषणस्थळी दाखल होऊन
उपोषण कर्त्यांबरोबर चर्चा केली परंतु उपोषणकर्त्यांनी तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ठोस लेखी आश्वासन मागितल्याने ही चर्चा निष्फळ ठरली.उपोषणकर्ते राजेंद्र सांगळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नगरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुरी कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तनपुरे कारखाना कामगारांनी गेल्या ४ दिवसापासून थकीत पगाराच्या मागणीसाठी उपोषण सूरु केले आहे.
गुरुवारी सकाळी उपोषण कर्ते आंदोलकांनी बोंबाबोंब आंदोलन करून व्यवस्थापक मंडळाच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेची तयारी सुरू केली असल्याची माहिती सोशल मीडियावरून संचालक मंडळाला समजल्यानंतर कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, संचालक शामराव निमसे, सुरसींग पवार, विजय डौले, महेश पाटील आदींनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली.
संचालक मंडळास मुदतवाढ मिळाल्यास प्रवरा बँकेकडून आर्थिक स्त्रोत उपलब्ध करून कामगारांचे काही अंशी पगार करण्याचे खा.विखे यांनी मान्य केलेले आहे, ते आज सहकार मंत्र्यांना भेटून संचालक मंडळास मुदतवाढ देण्याची मागणी करून लेखी आदेश घेण्याच्या प्रयत्नात आहे.
मात्र उपोषणकर्त्यानी आमच्या मागण्याबाबत उपोषणस्थळी आल्याबद्दल आभार व्यक्त करून जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या मार्फत लेखी आश्वासन दिले तर उपोषण मागे घेण्याचा निर्णय सांगितला. त्यामुळे संचालक मंडळ व कामगार यांची चर्चा निश्फल ठरली.
अखेर संचालक मंडळाने काढता पाय घेतला. याच दरम्यान श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा करताना मला काही करण्याजोगते आहे का असे विचारून मुदतवाढीच्या ३ महिन्यातील कामगारांचे पगार थकले असेल तर त्याचा पाठपुरावा केला असता परंतू हे ५ वर्षातील पगार थकले असल्याने त्यांची जबाबदारी आहे.
कामगारांच्या कष्टाचे पैसे कामगारांना मिळावे या हेतूने माझा कामगारांना पाठींबा असे आ.कानडे यांनी सांगितले. दरम्यान उपोषणकर्त्यांची देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जाकीर शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उपोषण कर्त्यांची तपासणी केली असता उपोषणकर्त्यामधील राजेंद्र सांगळे यांची प्रकृती खलावली असल्याचे वैद्यकीय तपासणीतुन पुढे आले. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉ. शेख यांनी दिला.
परंतु कामगारांना न्याय मिळेपर्यंत माझा लढा चालू राहील.मी उपचार घेणार असे ठणकावून सांगून राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख व पोलिसांनी श्री. सांगळे यांची समजूत काढून त्यांना उपचारासाठी राजी करून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम