अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- नगरमधील कापड बाजार येथे टू व्हिलर, फोर व्हिलर तसेच व्यावसायिकांना संपूर्ण मनपा रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे या भागात पार्किंगची व्यवस्था नाही, त्याचप्रमाणे अत्यंत गजबजलेला भाग असून,
या भागात महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही याबाबत शिव राष्ट्र सेनेच्यावतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड.अनिता दिघे यांच्या नेतृत्वाखाली मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडीचे अनिल शेकटकर, ओबीसी आघाडीचे बाबासाहेब करपे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेडाळे, भिंगार मंडल अध्यक्ष राकेश सारवान आदि उपस्थित होते.
यावेळी अॅड.अनिता दिघे म्हणाल्या, कापड बाजार हा शहरातील मोठी बाजार पेठ असल्याने शहरासह जिल्ह्यातून अनेकजण या ठिकाणी येत असतात, परंतु या ठिकाणी दुकानदार, छोटे व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने या ठिकाणी पार्किंगचीच व्यवस्था नाहीये. त्यामुळे रस्त्यावरच गाड्या पार्क होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचप्रमाणे या एवढ्यामोठ्या बाजारपेठेत स्वच्छता गृहांची कमतरता आहे,
विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहच नसल्याने महिलांची मोठी कुंचबना होत आहे. कापड बाजारातील अतिक्रमणे, पार्किंग, चोर्या आणि महिलांसाठीचे स्वच्छतागृह याकडे मनपाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असून, याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशाराही अॅड.अनिता दिघे यांनी दिला आहे. याप्रसंगी अनिल शेकटकर म्हणाले, कापड बाजारातील अतिक्रमण, स्वच्छतागृह, पार्किंग बाबत वेळोवेळी शिव राष्ट्र पक्षाच्यावतीने मनपास निवेदन देण्यात आलेले आहेत.
परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही. आंदोलन केल्यावरच हालचाल करणार का? असा सवाल उपस्थित केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांनी चर्चा करतांना सांगितले की, कापड बाजारातील अतिक्रमाणाबाबत मनपाच्यावतीने वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. परंतु व्यवसायिक पुन्हा त्या ठिकाणी येतात, त्यासाठी त्यांचे बेग पटांगण येथे छोट्या व्यवसायिकांना जागा उपलब्ध करुन देण्याचा पर्याय आहे.
वाढत्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिस प्रशासनाचेही सहकार्य घेण्यात येत आहे. तसेच गंजबाजार येथील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात येईल, त्याचप्रमाणे या भागात स्वच्छतागृहासाठी जागा पाहण्याचे काम सुरु असल्याचे सांगून याबाबत नक्कीच कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी बाळासाहेब जाधव, जालिंदर कुलट, रजनी ताठे, अलका पालवे, वंदना थोरवे, अमोल शेलार आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम