लोणी बुद्रूकचे माजी सरपंच काशिनाथ मुरलीधर पा.विखे यांचे निधन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती व लोणी बुद्रूकचे माजी सरपंच काशिनाथ मुरलीधर पा.विखे यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे ते पंचवीस वर्षे सरपंच होते. श्रीरामपूर बाजार समितीचे पाच वर्षे सभापती व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे पाच वर्षे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. ते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे चुलत भाऊ होते. विश्वासू असल्याने लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, साखर कारखाना,

जिल्हा बँक, प्रवरा बँक, नगर पालिका अशा संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जात असे. लोणी बुद्रुक गावाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले. गावाचा एकोपा टिकवून सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत गावाला विकासाकडे नेण्यात महत्वाची ठरली. बुधवार दि.२५ रोजी रात्रौ ९ वाजता त्यांच्या निधनाने वृत्त कळताच लोणी बरोबरच प्रवरा परिसरात शोक व्यक्त करण्यात आला.

लोणी बुद्रुक येथे गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विखे पाटील, ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ असावा,

लोणी बुद्रूकच्या सरपंच कल्पना मैड, लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, लोणी बुद्रुक विकास संस्थेचे अध्यक्ष चांगदेव विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, प्रवरा बँकेचे माजी संचालक किसनराव विखे, उपसरपंच गणेश विखे,

राहुल धावणे यांच्यासह प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते. याप्रसंगी आ. राधाकृष्ण विखे पाटील व अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या निधनाने प्रवरा परिवाराचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!