अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज बनली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. नेत्रदान व अवयवदान संबंधी समाजात असलेले गैरसमज दूर होण्याची गरज आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे.

आज देशात अनेक अंध व्यक्ती डोळ्यासाठी प्रतिक्षेत आहे. डोळे कृत्रिमरित्या तयार होत नसून, मनुष्यावर अवलंबून रहावे लागत आहे. मरणोत्तर नेत्रदान झाल्यानेच अंधाचे जीवन प्रकाशमान होणार आहे. शरीर हे नष्वर असून, मरताना नेत्रदान करुन अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांनी केले.

जिल्हा रुग्णालय नेत्र विभाग व फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने 36 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी डॉ. पोखरणा बोलत होते. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, नेत्रतज्ञ डॉ. संतोष रासकर, डॉ. अजिता गरुड, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, नेत्रचिकित्सा अधिकारी अशोक गायकवाड, नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. पोखरणा म्हणाले की, कोरोनाच्या भितीने माणुस माणसापासून दुरावत असताना, फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे नेत्रदान चळवळीतील कार्य प्रेरणादायी आहे. अनेकांचे नेत्रदान घडवून हजारो दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.

नागरदेवळे येथील एका छोट्याश्या गावातून जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान चळवळ व्यापक केली. जलसंपदा विभागात कार्य करीत असताना नेत्रदान चळवळीत मोलाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन समाजातील गोरगरीब, कष्टकरी,

शेतकरी, महिला, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बलघटकांना आधार देण्यात आला. तर नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदान घडवून तब्बल 1270 दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच वर्षभर फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदान चळवळ अविरत सुरु असल्याची त्यांनी माहिती दिली.

नेत्रतज्ञ डॉ. संतोष रासकर व डॉ. अजिता गरुड यांनी मरणोत्तर नेत्रदानाची माहिती देऊन, मृत्यू नंतर मयत व्यक्तीचे डोळे बंद करणे, डोळ्यावर स्वच्छ ओळे कापड ठेवणे, डोक्याखाली उशी ठेवणे, नेत्रपिढीस त्वरीत संपर्क करणे, मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर चार ते सहा तासाच्या आत डोळे काढल्यास बुब्बुळरोपन करण्यास उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक संभाजी भोस यांचे नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नेत्रदानाचे संकल्पपत्र भरले. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा अंतर्गत 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत विविध जनजागृतीवर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच मरणोत्तर नेत्रदान करणार्‍या व्यक्तींचे संकल्प पत्र भरुन घेतले जाणार आहेत.