कुकाण्यात दुतर्फा असलेल्या अतिक्रमणधारकांवर बांधकाम विभागाचा हातोडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील देवगाव चौक, तरवडी चौक, बसथांबा परिसर व जेऊरहैबती चौक ते हायस्कूलपर्यंतची दुतर्फा असलेल्या अतिक्रमणधारकांवर बांधकाम विभागाने ही कारवाई केली आहे.

यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान यापूर्वी सन २००० मध्ये ही अतिक्रमणे काढण्यात आली होती.

मात्र, पुन्हा या ठिकाणी व्यावसायिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करीत मोठमोठे शेड व टपऱ्या उभारल्या होत्या. या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होऊन रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.

त्यामुळे बांधकाम विभागाने मोठी कारवाई करीत जेसीबी यंत्रासह अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. कुकाणा बसथांब्यापासून शेवगाव व नेवासा मार्गाच्या दिशेने अतिक्रमणे काढण्यात आली.

या कारवाईत जवळपास दोनशेहून अधिक अतिक्रमण काढून जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान ही कारवाई करणार असल्याच्या नोटिसा संबंधितांना उपअभियंत्यांच्या स्वाक्षरीने दीड महिन्यापूर्वीच देण्यात आल्या होत्या.

नेवासाफाटा ते कुकाणा – चिलेखनवाडी मार्गाच्या रुंदीकरण व डांबरीकरण कामास सुरुवात होणार असल्याने डांबरीकरणास अडथळा ठरणारी अतिक्रमणे रस्ता काम सुरू होण्यापूर्वीच हटविण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe