अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- इसळक – खातगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी सात सदस्यीय समितीची स्थापना करत जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांना घेराव घातला.
उपाध्यक्ष शेळकेंनी हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून मार्गी लागणार असल्याची शेतकऱ्यांना माहिती दिली. मात्र, रस्त्याची पाहणी करण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली.
त्यांनी पाहणी करून या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्याच्या डागडुजीसाठी आणि बाभळी काढण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून प्रशासकीय अधिकार्यांना सूचना देखील केल्या आहेत.
शेतकरी संघटनेचे नेते संदीप गेरंगे यांनी सोशलमिडीयावर याबाबत पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली होती. शिवाय आगमी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
सदरच्या वृत्तास प्रसारमाध्यमांनीही प्रसिद्धी दिली होती. अध्यक्ष गेरंगे यांनी परिसरातील शेतकर्यांना सोबत घेत ‘इसळक – खातगाव रस्ता सुधार समिती’ची स्थापना करून उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांना निवेदन दिले आहे.
उपाध्यक्षांना दिलेल्या निवेदनात, रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधतानाच सदर रस्ता दोन महिन्यांच्या आत दुरुस्त करण्यात यावा. अन्यथा समितीच्या वतीने लोकवर्गणी करून रस्त्याची डागडुजी केली जाईल, आणि गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर समितीचे अध्यक्ष, संदीप गेरंगे, उपाध्यक्ष योगेश गेरंगे, सचिव पोपट गाडगे तसेच शिवाजी चव्हाण, योगेश चोथे, शरद वाबळे, विजय खामकर आदी सदस्यांनी सह्या केल्या आहेत. यावेळी समिती सदस्यांसह कैलास लांडे, किसन चव्हाण, संजय खामकर, गोरख चव्हाण, पोपट तांबे, उत्तम खामकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम