अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे वाळू मातीमिश्रीत लिलावामध्ये शेतीचा उतारा देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.
याप्रकरणी वाळू तस्करांना मदत करून शासनाची दिशाभूल केल्याच्या संशयाच्या भोवर्यात सरपंचांसह महसूलचे अधिकारी, वाळू लिलावधारक अडकले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे गट नंबर 414 मध्ये लिलाव करतो म्हणून दाखविण्यात आले आहे.
मात्र, या ठिकाणी उसाचे क्षेत्र आहे. ठेकेदारांनी या गट नंबरमध्ये वाळू उपसा न करता सरळ प्रवरा नदीपात्रात जेसीबी, पोकलेन व बोटीच्या सहाय्याने प्रचंड वाळू उपसा केला आहे, असा या ग्रामस्थांचा आरोप आहे. या घटनेला सरपंचच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बेकायदा वाळू उपशामुळे गावातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चिंचोली येथे प्रवरा नदीपात्रातून वाळू लिलावबाबत तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली होती.
तेव्हा उपस्थित ग्रामस्थांनी तहसीलदारांना सवाल करून उसाचे पीक असताना वाळू मातीमिश्रीत टेंडर कसे दिले? सर्व वाळू उपसा नदीपात्रातून करण्यात आला, याची माहिती अगोदर द्या, मग लिलाव देऊ, अशी मागणी केली होती. मात्र, यावर सरपंच एक शब्द न बोलता गप्प होते, असा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, यातील सर्वांची चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकारी, सरपंच व शेतकरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या ठिकाणी झालेल्या बेकायदा वाळू उत्खननाचा सर्व दंड शासनाची दिशाभूल करणार्या शेतकर्यांच्या शेतीवर टाकण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी यांना भेटून या संदर्भात ग्रामस्थ कारवाईची मागणी करणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम