आश्वी :- खासगी दूधसंघाला घातलेल्या दुधाच्या बिलाची रक्कम वारंवार तगादा करूनही डेअरी मालकाने देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील रहिमपूर येथे घडली आहे.
नितीन शिंदे (वय २८, रा. रहीमपूर, ता. संगमनेर) असे शेतकऱ्याचे नाव आहे. नितीन शिंदे हे शेतकरी असून आपल्या घरचे संकलित दूध एका खासगी दूध डेअरीला देत होते.
यापोटी नितीन व काही दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दूध संघाकडून बिलापोटी सुमारे ४ लाख २८ हजार रुपये येणे होते. हे पैसे मिळविण्यासाठी नितीन डेअरी मालकाकडे गेल्या काही दिवसांपासून तगादा करत होता.
परंतु, डेअरी मालकाने दूध बिलाचे पैसे देण्यास नकार दिला. यावेळी नितीन यांनी डेअरी मालकाला आपण विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचे फोनवरून सांगितले.
यावेळी तू माझ्या घरासमोर येऊन विष पिलास तरी मला काही फरक पडणार नाही, असे तो डेअरी मालक म्हणाला, असे नितीन यांच्या फोनवर संभाषण रेकॉर्ड झाले असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
या घटनेमुळे संतापून नितीन याने काल (दि. २२) दुपारी अडीचच्या सुमारास घरात विष प्राशन केले. यावेळी नितीनच्या घरच्यांना जेव्हा ही बाब लक्षात आली, त्यांनी लगेचच त्याला संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात हलविले.
सध्या त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याच्यावर उपचार सुरु आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.