‘त्या’ संपादकाला अटक होण्याची शक्यता

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी खोटी बातमी दिल्याच्या आरोपावरून औरंगाबाद येथील एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक व प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब उर्फ संजय रामनाथ पठाडे यांनी फिर्याद दिली आहे. पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटकेसंबंधी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. हजारे यांच्या तोंडी शिक्षकांविषयी अनुदार उद्गार घालून ही बातमी देण्यात आली होती.

त्यावरून शिक्षकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांच्याकडून हजारे यांच्या या कथित वक्तव्याचा निषेधही करण्यात आला. त्यानंतर हजारे यांनी आपण असे वक्तव्य केलेच नसल्याचे सांगितले. संबंधित वृत्तपत्राला नोटीसही पाठविण्यात आली.

त्यानंतर काही शिक्षक संघटनांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे पठाडे यांनी काल रात्री पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम १५३ अ (१)(ब)(क) तसेच ५०४, ५०४ (२) नुसार गुन्हा दाखल केला. या कलमांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe