अहमदनगर: डॉ. प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुदायिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी या युवतीवर काही नराधमांनी सामुदायिक बलात्कार करुन, तिची हत्या केली. तर सदर युवतीच्या प्रेतास जाळण्यात आले.
घडलेला हा प्रकार संपूर्ण मानव जातीस काळिमा फासणारा आहे. आजही महिला व मुली सुरक्षित नसल्याचे या घटनेवरुन अधोरेखित होत आहे.
निर्भया नंतर असे प्रकार सातत्याने घडत असून, महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच शहरासह जिल्ह्यात देखील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत असून, अनेक ठिकाणी महिलांची छेडछाडचे प्रकरण समोर येत आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्यात यावे.
तसेच अहमदनगर प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करुन सामाजिक उपक्रमाद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.