नगर : सिक्युरिटी कंपनीत कामाला लावतो म्हणून तालुक्यातील कळस बुद्रुक येथील ७४ तरुणांना सुमारे सात लाख रूपयांना गंडा घालण्यात आला.
याप्रकरणी पुणे येथील दाम्पत्याविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नितीन महाजन याने बालाजी कंपनीत ७४ तरूणांची सिक्युरिटीसाठी निवड केली.
प्रत्येकाला ड्रेससाठी ३२४० रूपये याप्रमाणे दोन लाख ३९ हजार ७६० रूपये रक्कम व संजय जाधव यांना सुपरवायझर पदासाठी २५ हजार रुपये,
तर आशालता महाजन हिने क्लार्क पदासाठी भरती करून देते यासाठी तिने १८ लोकांकडून २५ हजार रूपये याप्रमाणे एकूण चार लाख ३३ हजार रूपये असे एकूण सहा लाख ७२ हजार रूपये जमा करून ते नितीन विजय महाजन याना अहमदनगर जिल्हा बँक अकोले शाखा व स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राद्वारे रोख दिले.
याप्रकरणी कळस बु. (ता. अकोले) येथील संजय विश्वनाथ जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली.
यावरून अकोले पोलिसांनी कात्रज (पुणे) येथील नितीन विजय महाजन व आशालता नितीन महाजन या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.