नगर : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणारा सोमनाथ उर्फ वैभव अशोक अभंग (वय १८) हा विद्यार्थी मित्रांबरोबर गावातीलच बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता.
पण बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे चंदनापुरी गावावर शोककळा पसरली आहे.
सोमनाथ उर्फ वैभव अभंग हा तरुण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा याठिकाणचा रहिवासी होता. तो शिक्षणासाठी संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे असलेले त्याचे मामा गोकुळ अण्णासाहेब बोऱ्हाडे यांच्याकडे आला होता आणि गावातीलच चंदनेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
रविवारी सुट्टी असल्यामुळे सोमनाथ हा दुपारी चार वाजेच्या सुमारास गावातील आपल्या मित्रांबरोबरच परिसरात असणाऱ्या एका बंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता.
बंधाऱ्यातील पाण्यात पोहत असतांना सोमनाथ याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती गावातील काही नागरिकांना समजताच नागरिकांनी बंधाऱ्याच्या दिशेने धाव घेतली आणि पाण्यामधून सोमनाथला वर काढण्यात आले.
त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेद्वारे औषधोपचारासाठी घुलेवाडी ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले होते. पण त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले.