नगर : “भिंगार गावचा पाणीपुरवठा नियमित व मुबलक कसा होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून येथील जनतेला न्याय देऊ,” असे आश्वासन भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
भिंगार बँकेच्या कार्यालयात खा.विखे यांची भिंगारच्या समस्यांबाबत पहिली बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भिंगार बँकेचे चेअरमन गोपाळराव झोडगे यांनी तर भिंगार भाजपतर्फे महेश नामदे यांनी डॉ.विखे यांचा फेटा बांधूंन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी झोडगे यांनी पाणी पुरवठा सुरळीतपणे व्हावा, चटईक्षेत्र निर्देशांकात वाढ करणे, कापूरवाडी तलावातील गाळ काढणे, याविषयीच्या व्यथा खा. विखे यांच्या पुढे मांडल्या. कँन्टोन्मेंटचे संबंधित अधिकारी कर्मचारी पाणीप्रश्न खरी माहिती सांगत नाहीत. ते याबाबत लपवाछपवी करतात.
त्यांच्याकडे कोणत्याही समस्या विषयी चौकशी केली असता व्यवस्थित माहिती मिळत नाही. कर्मचारी उद्धटपणे वागतात असे सांगून बँकेचे संचालक नाथा राऊत यांनी त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असे त्यांनी विखे यांना सांगितले.
भाजप शाखेच्यावतीने याआधी पाणी प्रश्न सोडविण्या विषयी प्रयत्न केलेले आहेत. राज्य मंत्रालयात कॅबिनेटची बैठक घेऊन पाणीप्रश्नी काय निर्णय झाला याची माहिती महेश नामदे यांनी दिली.
चटईक्षेत्र निर्देशांकात अंकात् वाढ करावी अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉ विखे यांच्याकडे केली .लोक गाव सोडून चालले आहेत असे यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. विखेंनी पाणीप्रश्नाची सर्व माहिती जाणून घेतली.
लष्कराच्या एम ई एस चे गँरिसन इंजिनीयर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ यांची संयुक्त बैठक घेऊन गावाला करारानुसार नियमित पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करू.
त्यानंतर एमआयडीसीकडून थेट कँन्टोन्मेंट ला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.असे खा. विखे यांनी सांगितले.
कापूरवाडी तलावातील गाळ प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कळवू असे ते म्हणाले.तर चटईप्रश्नी नेमक्या अडचणी काय आहेत याबाबत संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करुन तो सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक बाळासाहेब पतके, भाजपचे रविंद्र बाकलीवाल, शामराव बोळे, अनंत रासने, निलेश साठे, अनिरुद्ध देशमुख, स्वप्नील देवतरसे, अँड अक्षय भांड, नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे आदी उपस्थित होते.