अहमदनगर :- नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा गावरान कांदा, तसेच लाल कांद्याला विक्रमी १०० ते १३० रुपये किलो भाव मिळाला.
गतवर्षीचा दुष्काळ आणि यावर्षीची अतिवृष्टी यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या महिन्यापासून कांद्याची आवक कमी होत असताना देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. मागील काही दिवसांत कांद्याचा भाव ८२ रुपयांपर्यंत गेला होता.
शनिवारपासून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये घोडेगाव (ता. नेवासे) येथील रोटेशन पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले आहेत.
पहिल्याच लिलावात गावरान कांद्याला ८२ रुपये, तर लाल कांद्याला ६२ रुपये दर मिळाला होता. सोमवारी रोटेशन पद्धतीने दुसरा लिलाव होता.
त्यासाठी सुमारे १५ हजार गोण्या कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. कांद्याला मागणी असल्याने व्यापाऱ्यांनी चांगल्या कांद्याच्या लिलावाला जास्त बोली लावली.
चांगल्या दर्जाच्या गावरान कांद्याला उच्चांकी म्हणजे क्विंटलला १० हजार रुपये भाव मिळाला.नगर कृषी बाजार समितीत चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी येत असल्याने देशभरात हा कांदा विक्रीला जातो.
सोमवारच्या लिलावात मिळालेला भाव राज्यात सर्वाधिक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या लिलावात तब्बल दुप्पट भाव वाढला आहे.