अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कुकडी कॅनॉलसाठी संपादित करण्यात आलेल्या जमीनीचा निम्मा मोबदला मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्त काळे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण केले.
तर अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सामाईक हिस्सेदार असलेल्या व्यक्तीने संपुर्ण रक्कम हडप केल्याचा आरोप करण्यात आला अहे. यावेळी अशोक काळे, चंपा पवार, महाजीद काळे, स्वाती काळे, राधा काळे, मनोज काळे, राजनंदिनी काळे, आरपीआय आदिवासी पारधी आघाडीच्या पार्वती भोसले आदिंसह काळे कुटुंबीय उपस्थित होते.
राशीन येथील मौजे देशमुखवाडी (ता. कर्जत) येथील जमीन गट नंबर 426 क्षेत्र 2 हेक्टर 31 आर या एकूण क्षेत्रामध्ये मात्रीबाई अशोक काळे यांची 1 हेक्टर 16 आर अधिक पो.ख. 0.28 आर क्षेत्र आहे.
या संपुर्ण गटामध्ये नितीन बबन शिंदे सामाईक हिस्सेदार आहे. या क्षेत्रापैकी 0.48 आर क्षेत्र चिलवडी शाखा कालवा 10 ते 15 कि.मी. साठी काळे व शिंदे यांचे समाईक क्षेत्र संपादित झाले आहे.
या संपादित क्षेत्राची नुकसान भरपाईपोटी मोबदल्याची रक्कम 14 लाख 15 हजार 712 रुपये रक्कम जमीन मालकांना देण्याचे सरकारने निश्चित केले आहे. यामध्ये काळे यांचा अर्धा हिस्सा होता.
मात्र काळे हे पारधी समाजातील अशिक्षित असल्याने याचा फायदा घेऊन नितीन शिंदे याने जमिनीचा मोबदला घेण्यासाठी कागदपत्र तयार करायचे असे सांगून, फसवणूक करून संमतीपत्र त्याच्या लाभात लिहून घेतले असल्याचा आरोप काळे कुटुंबीयांनी केला आहे.
काळे यांचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांची फसवणुक झाली असून, जमीन संपादित होऊन देखील त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही.
भूमी अभिलेख कार्यालयाने नितीन बबन शिंदे यास ठरलेली पुर्ण रक्कम अदा केली आहे. कार्यालयाकडे अनेकवेळा तक्रार करुन देखील संपादित जमीनीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. कुकडी कॅनॉलसाठी संपादित करण्यात आलेल्या जमीनीचा निम्मा मोबदला मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्त काळे कुटुंबियांनी उपोषण सुरु केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम