अहमदनगर जिल्हयातील लोक न्यायालयात ७२ कोटी ६७ लाख रुपयांची वसुली

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २५ सप्टेबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात करण्यात आले होते.

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन. आय. अॅक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्यातील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे,

वीज महावितरणची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती. जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये कोव्हीड- १९ नियमांचे तंतोतंत पालन करून नागरिकांची प्रकरणे आपसामध्ये समझोता करुन मिटविण्यात आली.

अहमदनगर जिल्हयामध्ये १३१४८ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर २९५२ प्रलंबीत प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. तसेच ७२,६७,९१,५९४/- रक्कमेची वसुली करण्यात आली. ८४२२१ प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती. १६१०० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली.

अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयात हे लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे हे लोकअदालत अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर मा. श्री. सुधाकर वें.यार्लगड्डा व जिल्हा न्यायाधीश-१ श्री. मिलींद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष श्री. भुषण ब-हाटे,

सेंट्रल बार असोसिएशन अध्यक्ष श्री सुभाष काकडे, सरकारी वकील श्री.सतिश पाटील व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा न्यायालयाचे प्रांगण रांगोळी व फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले होते. पारंपरिक न्यायालयापेक्षा आगळे वेगळे स्वरूप न्यायालयास देण्यात आले होते.

बँका, महानगरपालिका यांची दाखलपूर्व प्रकरणे मिटवण्यात आली. महानगरपालिकेची करवसुली प्रकरणे यामध्ये ठेवण्यात आली होती. त्यासाठी वेगळा मंडप व पक्षकारांच्या सुविधेसाठी अनेक काउंटर ठेवण्यात आले होते. करवसुली प्रकरणांना नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सदरचे लोकन्यायालय न्यायाधीश, वकील, पोलीस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरितीने पार पडले. कोव्हीड- १९ रोगाचा प्रादुर्भाव असतांना देखील जिल्हयात राष्ट्रीय लोकदालतीस उदंड प्रतिसाद मिळाला.अशी माहिती रेवती रा. देशपांडे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी दिली आहे‌.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe