संगमनेर :- येथील बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल १७ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. बाजार समिती स्थापनेपासून इतिहासात पहिल्यांदाच कांद्याला उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती सभापती शंकर खेमनर यांनी दिली.
यावर्षी सेंद्री लाल कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील. म्हणून तालुक्यासह पठार भागावरील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्री कांदा केला होता. सुरुवातीला कांद्याचे पीक चांगले उतरूनही आले होते, पण मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार कांद्याची पेरणी करण्याची वेळ आली होती.
मात्र, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसाने संगमनेर तालुक्यासह पठार भागाला चांगले झोडपले होते. त्यामुळे सेंद्री लाल कांद्याचे मोेठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेल्या सेंद्री लाल कांद्याचा घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे.
कांदा सडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली होती, पण आता थोड्याफार प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने सध्या सेंद्री लाल कांद्यासह गावठी कांद्याला सोन्याचे भाव आले आहे. असे असले तरी ज्या ठिकाणी पन्नास गोण्या कांदा निघत होता. आज त्या ठिकाणी पाच ते दहा गोण्या कांदा निघत आहे.
त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. जर परतीचा पाऊस झाला नसता, तर आज सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मालामाल झाला असता. सुकेवाडी येथील गोरख सीताराम सातपुते या शेतकऱ्याने पाच गोण्या कांदा विकण्यासाठी संगमनेर बाजार समितीत मंगळवारी आणला होता. बाजार समितीत झालेल्या लिलावात सातपुते यांच्या कांद्याला १७ हजार १०० रुपयापर्यंतचा भाव मिळाला आहे.