संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार घटनेच्या तत्त्वावरील असून सामान्य माणसाच्या विकासाचे आहे, तर भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
मंत्री झाल्यानंतर प्रथमच शुक्रवारी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन यशोधन इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते.
मंत्री थोरात म्हणाले, भाजपचा कारभार म्हणजे राजकारणातला व्यापार आहे. प्रत्यक्षात मात्र व्यापारी, कामगार, शेतकरी यांची सर्वाधिक हानी यांच्या कारकिर्दीत होत आहे. जनतेनेच अशी युती व्हावी व भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवावे, अशी इच्छा व्यक्त केल्यानेच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्याने ते म्हणाले.
या युतीचे खरे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला व संजय राऊत यांच्या बुद्धी कौशल्याला आहे. खरे मॅन ऑफ दि मॅच संजय राऊत यांना द्यावी लागेल. शिवसेनेच्या भूमिकेमुळेच आम्ही चर्चेची दारे उघडी ठेवली.
त्यांनी दिल्लीच्या तख्ताला मराठी बाणा दाखवला. काँग्रेसच्या गंभीर परिस्थितीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आपल्यावर पक्षाची जबाबदारी सोपवली. कमी काळात सातत्याने राज्यभर फिरून कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो.
माझ्या जीवनातील हा वेगळा कालखंड असून मतदारसंघात वेळ देता आला नाही. परंतु अप्रत्यक्षपणे अनेक कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले. अशा सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून त्यांनी सर्व प्रथम निळवंडे पाटपाण्याच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
माध्यमांनी आपल्याला भरपूर प्रसिद्धी दिली. संगमनेर तालुक्याच्या घराघरात बाळासाहेब थोरात ही तुमची घोषणा संपूर्ण राज्यात झाली. याचे समाधान व्यक्त करून त्यासाठी मागे तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या शुभेच्या आणि प्रेम आहे. अशा कृतज्ञ भावना या वेळी त्यांनी व्यक्त केल्या.