कोपरगाव : सोनारी येथील सुकदेव आघाव हे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धारणगाव रस्त्याने दुचाकीवरून जात असताना चिनी बनावटीच्या नायलॉन मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला.
ते गंभीर जखमी झाले आहेत. शहरात हा धोकादायक मांजा सर्रास विकला जात असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. त्याबद्दल जनतेत चीड निर्माण झाली आहे.
आघाव हे संजीवनी साखर कारखान्यात कामास असून काम आटोपून ते घरी सोनारी येथे जात असताना रस्त्यावर काही मुले पतंग उडवत होती.
पतंगाचा नायलॉन मांजा आघाव यांच्या गळ्याला टाचून गेला आणि काही कळण्याच्या आतच ते दुचाकीसह खाली कोसळले. आजुबाजूच्या लोकांनी मदत करून त्यांना रूग्णालयात नेले. त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार चालू आहेत.
ही घटना घडल्यानंतर पतंग खेळणाऱ्या मुलांनी धूम ठोकली. चिनी मांजा अतिशय धोकादयाक असून त्यावर बंदी घाला, विक्रेत्यांवर कारवाई करावी, या मागणीकडे प्रशासन गांभीर्याने पहात नाही.