…तर त्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू – आ. जगताप

Ahmednagarlive24
Published:
अहमदनगर  – शहरात मागील अनेक दिवसांपासून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून, त्या माध्यातून प्रतिष्ठीत लोकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडत आहेत. 
अशा प्रकाराचा अन्याय यापुढे कोणावरही होऊ देणार नाही. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू, असा इशारा देतानाच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची माहिती पोलिसांकडून मागवून घेणार असून अशांवर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
शहरातील व्यापारी राजेंद्र चोपडा यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असून सदर प्रकरणी सखोल चौकशी करुन चोपडा यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना सोमवारी (दि.9) देण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप बोलत होते.
निवेदनात आमदार जगताप यांनी म्हटले आहे, की राजेंद्र चोपडा अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक आहेत. शहरात सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करुन त्यांची प्रतिमा समाजात मलिन करण्याचा प्रयत्न तक्रारदाराचा आहे.
तक्रारदारांची यापूर्वीची पार्श्वभूमी तपासली असता सन 2017 साली याच लोकांनी अनधिकृतपणे राजेंद्र चोपडा यांच्या क्षेत्रावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती व त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तात या लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. या बाबत न्यायालयातही प्रकरण प्रलंबित आहे. तसेच तक्रारदार कधीही राजेंद्र चोपडा यांच्याकडे कामास नव्हते. त्यामुळे सदरचा गुन्हा खोटा दाखल केल्याचे सिद्ध होते.
तसेच अशा प्रकरणात बेकायदेशीरपणे ताबा घेऊन खोटे गुन्हे दाखल होण्याच्या घटना यापूर्वीही अहमदनगर शहराच्या इतर भागातही घडल्या आहे. त्यामुळे आपल्यावर खोटे गुन्हे दाखल होतील, या भीतीने कित्येक पीडित नागरिक पोलीस प्रशासनाकडे तक्रार करत नाहीत.
अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात सखोल चौकशी करुन राजेंद्र चोपडा यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment