एसटीच्या संपाबाबत राज्याने तातडीने भूमिका घ्यावी – आमदार तांबेंची मागणी

Published on -

परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी सुरु केलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

संपाबाबत राज्य शासनाने तातडीने भूमिका घेत त्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान या पत्रात म्हटले आहे की, एसटी कर्मचारी हे सणासुदीच्या व अत्यंत अडचणीच्या काळात ही रात्रंदिवस काम करत असतात. त्यांचे वेतनही अल्प असते.

त्यांची होणारी वार्षिक वेतनवाढ ही अल्प असते. याशिवाय आर्थिक परिस्थितीमुळे एसटी महामंडळ जे पगार करते ते वेळेत होत नाही. अशा सर्व बाजूंनी हे एसटी कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.

त्यामध्ये अनेकांची आर्थिक कुचंबणेमुळे कुटुंबाचे हाल होत आहेत. आर्थिक विवंचनेमुळे काही कर्मचार्‍यांनी आत्महत्या सुद्धा केली आहे. या गोष्टींची गंभीरता लक्षात घेत कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी काढावे अशी मागणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe