अहमदनगर : कोठी येथील सुजाता मकासरे (वय ४५) या महिलेचा डेंग्यूच्या आजाराने बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.
डेंग्यूसदृश्य आजाराने त्या काही दिवसापासून आजारी होत्या. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता.
बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वारंवार मागणी करुन देखील कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या भागातील संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. कोठी भागातील स्वच्छतेच्या प्रश्नासाठी प्रभागातील नागरिक जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यास जाणार आहेत.
कोठी येथे अनेक भागात अस्वच्छता पसरलेली असून, उघड्यावरच्या गटारी देखील तुंबलेल्या अवस्थेत आहे.
या प्रश्नांवर मनपा प्रशासन व प्रभागातील नगरसेवक देखील लक्ष देण्यास तयार नसल्याचे नागरिकांनी आरोप केला आहे.
या भागात अस्वच्छतेने साथीचे आजार पसरत असून, अनेक घरांमध्ये आजारी रुग्ण आढळत आहे. यावर मनपा प्रशासनाने उपाययोजना म्हणून अद्यापि औषध फवारणी व फॉगिंग देखील केलेली नसल्याची माहिती स्वप्नील शिंदे यांनी दिली.