लंडन :- बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट यंदाची, तर अभिनेत्री दीपिका पादुकोण ही दशकातील सर्वात आकर्षक महिला ठरली आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये बुधवारी जारी करण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात या दोघींना हा बहुमान देण्यात आला.
ब्रिटिश साप्ताहिक वृत्तपत्र ‘ईस्टर्न आय’ने आशियातील सर्वात आकर्षक महिलांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार २०२० च्या ऑस्करसाठी भारताकडून पाठविण्यात आलेल्या ‘गली बॉय’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आलिया भट्टला यंदाच्या सर्वात आकर्षक महिलेचा किताब देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी या यादीत पहिल्या स्थानावर असलेली दीपिका यंदा दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. मात्र, दशकातील सर्वात आकर्षक महिलेचा मान यंदादेखील दीपिका पादुकोणला मिळाला आहे. ‘टॉप १०’ च्या या यादीत छोट्या पडद्यावरील हिना खान हिने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या अभिनेत्री माहिरा खानने सर्वात आकर्षक पाकिस्तानी महिलेचा किताब सलग पाचव्या वर्षी कायम ठेवला आहे. कॅटरिना कैफ हिने सहावे, तर बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचे नाणे खणकाविणाऱ्या प्रियंका चोप्राने १० वे स्थान मिळवले आहे.
आपल्याला मिळालेल्या बहुमानाबद्दल आलियाने आनंद व्यक्त केला आहे. खरे सौंदर्य हे आपल्याला दिसते त्यापेक्षा अधिक असते. आपण म्हातारे होत जातो. वेळेबरोबर आपण कसे दिसतो यामध्ये देखील खूप फरक पडतो; परंतु निर्मळ मन असेल तर आपण नेहमी सुंदर दिसतो. आपल्या सगळ्यांना याच गोष्टीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे आलियाने यावेळी म्हटले.