श्रीगोंदा : तालुक्यातील सुरेगाव शिवारातील मनीषा दत्तात्रय भोसले वय २५ या गरोदर महिलेला दि.२४/११/१९ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती बाजार करून घरी जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून तिला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तोंडात कापड कोंबून आठ जणांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती.
यात मनीषा गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र दि.९/१२/१९रोजी उपचारादरम्यांन तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मयत मनीषा हिची आई रमेशबाई उंबरलाल काळे यांच्या फिर्यादीवरून मनीषा हिच्या खून प्रकरणी
आदिक आजगन काळे, समीर आदिक काळे, सिटी आदिक काळे (तिघे रा.म्हसने, ता.पारनेर),जाहीर घड्याळ्या चव्हाण, जावेद घड्याळ्या चव्हाण, घड्याळ्या हिरामण चव्हाण (तिघे रा.सुरेगाव, ता.श्रीगोंदा), प्रवीण कळशिंग्या भोसले, भैय्या कळशिंग्या भोसले (दोघे रा.खरातवाडी, ता.श्रीगोंदा) या आठजणांविरोधात खुनासह आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, मयत मनीषा हिच्या आईने बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत मनीषा हीचे आरोपी घड्याळ्या हिरामण चव्हाण याच्यासोबत सुमारे तीन वर्षांपूर्वी भांडण झाले होते.
त्या भांडणाचा राग मनात धरून मयत मनीषा भोसले ही दि.२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारस विसापूर येथील आठवडे बाजार करून आपल्या सुरेगाव येथील घरी जात असताना वरील आठ आरोपींनी तिला विसापूर शिवारात रेल्वे रुळालगत असलेल्या कच्या रस्त्यावर अडवून,
तिला दमदाटी करत रिव्हॉल्वरचा धाक दाखवत ती ओरडल्याचा कुणाला आवाज येऊ नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून या आठही आरोपींनी तिला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. दोन महिन्यांच्या गरोदर असलेल्या मनीषाच्या गर्भाला या मारहाणीत दुखापत झाली होती. तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान मनीषा ही मयत झाली.