औरंगाबाद: शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह असल्याची भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केली आहे.
व्यक्ती गायब होण्याच्या अशा प्रकारातून मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमून तपास आणि आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश नगरच्या पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
दरम्यान, माहिती अधिकारात मागील दहा महिन्यांत ८८ व्यक्ती शिर्डीतून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी मनोजकुमार सोनी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस सादर केली आहे.
याचिकेनुसार, ऑगस्ट २०१७ मध्ये ते पत्नी आणि दोन मुलांसह शिर्डीला दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर प्रसादालयापासून त्यांची पत्नी बेपत्ता झाली. बराच शोध घेतल्यानंतर त्यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
पत्नीच्या तपासाबाबत त्यांनी पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा, चौकशी केली, परंतु त्यांना दाद मिळाली नाही. प्रसादालयाजवळचे सीसी टीव्ही बंद असल्याचे या वेळी आढळून आले. त्यांनी माहितीच्या अधिकारात शिर्डीतून अशा प्रकारे बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मागवली असता, जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीतच ८८ पेक्षा जास्त व्यक्ती बेपत्ता असल्याचे आढळले.
यासंदर्भात खंडपीठात वेळोवेळी झालेल्या सुनावणीत नगर येथील पोलिस अधीक्षकांना पाचारण करण्यात येऊन यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शिर्डी येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यात परराज्यांतून येणारांचे प्रमाण मोठे आहे.
मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या यात गुंतलेल्या आहेत काय, या दृष्टीने तपास व्हावा. परराज्यांतून आलेल्या भाविकांना लक्ष्य केले जाते आहे, भाविकांचे अशा प्रकारे बेपत्ता होणे अतिशय धोकादायक आहे, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले होते.
शिर्डी येथे याबाबत जनजागृतीसाठी पोस्टर लावावेत, आपल्या माणसांची काळजी घेण्याचे आवाहन करावे, सीसी टीव्ही लावावेत अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. सुनावणीत नगरच्या पोलिस अधीक्षकांनी विशेष पथक स्थापन करावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. पुढील सुनावणी १० जानेवारी २०२० ला होणार आहे.