अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. माजीमंत्री शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा तर झाला नाही उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसानच झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी व्यक्त केली.
उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी आशिष शेलार नगर जिल्ह्यात आले होते. यावेळी पराभूत झालेल्या बाराही उमेदवारांसोबत त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राम शिंदे बोलत होते.
‘पराभूत उमेदवारांची पराभवाची कारणे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आशिष शेलार यांना नियुक्त केलं आहे.
पूर्वी नगर जिल्ह्यात पाच आमदार होते. किंबहूना निवडणुकीच्या आधी मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे पाटील पक्षात आल्याने ती संख्या सातवर गेली होती.
या निवडणूकीत या आकड्यात वाढ होणं अपेक्षित होतं. मात्र ती संख्या होती त्या पेक्षा कमी होऊन तीनवर आली आहे’, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.
ज्या पक्षात जातात त्या पक्षात खोड्या करतात…
‘निवडणुकीत विखेंनी सांगितलं होतं की ही भाजपच्या आमदारांची संख्या 12 करू मात्र तसं काहीही झालेलं नाही.
विखे यांची फार काही मोठी ताकद नव्हती. उलट त्यांची पूर्वापार परंपरा राहिली आहे की ते ज्या पक्षात जातात त्या पक्षात खोड्या करतात.
त्या पक्षासाठी हानीकारक वातावरण निर्माण करतात. ते पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं आहे.’, अशा शब्दात राम शिंदे यांनी विखे पाटलांच्या राजकारणावरच भाष्य केलं आहे.