निर्मला सीतारमण यांनी मिळविला ह्या यादीत ३४ वा क्रमांक

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली: देशाच्या आर्थिक स्थितीवरून विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा जगातील १०० सर्वात सामर्थ्यशाली महिलांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘फोर्ब्स’ मासिकाने सीतारमण यांना आपल्या यादीत ३४वे स्थान दिले आहे. तर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल सलग नवव्या वर्षी अव्वल स्थानी आहेत.

‘टाइम’च्या पर्सन ऑफ द इअरची मानकरी ठरलेल्या १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गचादेखील प्रथमच यादीत समावेश करण्यात आला आहे. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारमण यांनी ‘फोर्ब्स’च्या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळविले आहे.

१०० सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत सीतारमण या ३४व्या स्थानावर आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात संरक्षणमंत्री राहिलेल्या सीतारमण यांना मोदींनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.

सीतारमण या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काही काळ अर्थमंत्रालयाची जबाबदारी आपल्याकडे ठेवली होती.

या यादीतील अन्य भारतीयांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ व कार्यकारी संचालक रोशनी नडार-मल्होत्रा आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मझुमदार-शॉ यांचा समावेश आहे.

मल्होत्रा यांना यादीत ५४वे तर मझुमदार यांना ६५वे स्थान देण्यात आले आहे. किरण मझुमदार यांनी आपली संपत्ती स्वत: कमावली आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी यादीतील आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे.

दुसऱ्या स्थानी युरोपियन केंद्रीय बँकेच्या अध्यक्षा ख्रिस्तिन लेगार्ड आहेत. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांना यादीत तिसरे स्थान देण्यात आले आहे. शेजारील बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या २९व्या स्थानावर आहेत.

यादीमध्ये बिल ॲण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहअध्यक्षा मिलिंडा गेट्स सहाव्या स्थानी, आयबीएमच्या सीईओ गिनी रोमेटी नवव्या स्थानी, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अँड्रेन ३८व्या स्थानी, डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प ४२व्या स्थानी, टेनिस स्टार सेरेना विल्यम्स ८१व्या स्थानी आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग १००व्या स्थानावर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment