संगमनेर : शहरातील तीन बत्ती चौकात एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
भावडू रमेश ढेपणे (वय २२, हरसूल, जि. नाशिक) असे मोटरसायकलस्वराचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातील भावडू ढेपने हा संगमनेरात एका मंडपवाल्याकडे काम करत होता.
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तो मोटारसायकलवरुन तीनबत्ती चौकात आला. तेथे त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला.
त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.
त्याच्या मृतदेहाचे कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरुन शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.