कोरोना लस घेतल्याशिवाय व मास्क असल्याशिवाय दारू मिळणार नाही !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणापासून एकही व्यक्ती वंचित राहू नये यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे.

असे असताना ‘हम भी कुछ कम नही’ या म्हणीप्रमाणे श्री संत दामाजी साखर कारखान्यावर एका देशी दारू व बिअर शॉपी या परवानाधारक दुकानदाराने चक्क कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याशिवाय व मास्क असल्याशिवाय दुकानात प्रवेश नसल्याचा फलक लावल्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांचे लक्ष केंद्रीत होवून तो एक चर्चेचा विषय बनला आहे.

शासनाने आदेश काढून प्रत्येक गावातील नागरिकाने कोरोनाचे दोन लसीचे डोस घेणे बंधनकारक केले असून, न घेणार्‍यास शासकीय योजनाचा लाभ, पेट्रोल, धान्य बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

या इशार्‍यामुळे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून लसीकरण करून घेत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच श्री संत दामाजी कारखान्यावर असलेल्या देशी दारू व बिअर शॉपी परमीटधारक चालकाने दुकानाच्या बाहेर चक्क लसीचे डोस घेतल्याशिवाय व मास्क लावल्याशिवाय दुकानात प्रवेश दिला जाणार नाही,

असा ठळक अक्षरात भला मोठा बोर्ड लावला आहे. कारखाना परिसरात येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष तो फलक खेचून घेत आहे.

परिणामी, चक्क दारू दुकानदाराने फलक लावल्याचे चर्चा संपूर्ण तालुकाभर होत असून, दारू पिण्यास मिळणार नाही. या भीतीपोटी पिणेवाले प्राथमिक आरोग्य केंद्राचा रस्ता शोधताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe