अहमदनगर : कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नुकतेच सुजाता सुरेश मकासरे या महिलेचे डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाले आहे. या भागात स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करून नागरिकांना एक प्रकारे संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली.
यावेळी स्वप्नील शिंदे, संजय कांबळे, सुशांत देवढे, रमाकांत सोनवणे, संजय तडके, बबलू गायकवाड, चिकू गायकवाड, रवींद्र पोळ, हिरा कांबळे, सखुबाई शिरोळे, सविता गायकवाड, मधुमती केदारे, शोभा देवडे, शोभा कांबळे, सुरेखा बारके, चंद्रकांत क्षेत्रे आदी उपस्थित होते.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, की कोठी परिसरात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या भागात अस्वच्छता पसरलेली असून, उघड्यावरच्या गटारी देखील तुंबलेल्या अवस्थेत आहे. प्रत्येक घरात साथीच्या आजाराचे रुग्ण आढळत आहे. मनपा प्रशासन व प्रभागातील नगरसेवकदेखील या प्रश्नांकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे नागरिकांनी आरोप केला आहे.
या परिसराची पाहाणी करून साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण परिसराची स्वच्छता करून औषध फवारणी व फॉगिंग करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.