अमरावती : हॉटेलमध्ये मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मुलीला तिच्या पित्यासमोर उभे केले असता पित्याने यूटर्न घेत तिला पुन्हा घरात घेण्यास नकार दिला.
पित्याच्या नकार घंटेमुळे पोलिसांपुढे पेच निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी बाल न्याय समितीच्या अनुमतीने अल्पवयीन मुलामुलीस सुधारगृहात पाठविले.
बुधवारी (ता.४) मुलीच्या (१४) पित्याच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात अल्पवयीन मुलाविरूद्ध (१६) अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. दोघेही गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत राहतात.
ती एकदिवस अल्पवयीन मुलासोबत तिच्या भावाला दिसली. त्यामुळे घरी गेल्यास भाऊ रागावेल या भीतीमुळे आपण आपल्या अल्पवयीन मित्रासोबत रेल्वे आधी मुंबईत निघून गेले.
त्यानंतर ते परतवाडा, लाखनवाडी आणि शेवटी चांदूर बाजार तालुक्यातील वडुरा गावात मुलाच्या आजीकडे राहत होते. मुलगी तिचा भाऊ आणि वडिलांसोबत राहते. तिच्याजवळ तिची आई राहत नाही.
गावातील एका होमगार्डने अल्पवयीन मुलगा, मुलगी गावात सोबत राहत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. त्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलामुलीस ताब्यात घेतले.