अहमदनगर :- महापालिकेच्या 32 सफाई कर्मचार्‍यांचा सन्मान !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जनजागृती व प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. याचाच भाग म्हणून मागील आठ महिन्यात स्वच्छताविषयक उत्कृष्ट काम करणार्‍या 32 सफाई कर्मचार्‍यांसह शासकीय कार्यालये, शाळा, हॉटेल व हॉस्पिटल अशा 12 संस्थांचाही गौरव सोमवारी (दि.16) महापालिकेच्या वतीने केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका सहभागी झालेली आहे. ‘थ्री स्टार’ रँकींग मिळविण्यासाठी मनपाकडून युध्दपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.

यात जनजागृतीसह प्रोत्साहन देण्यासाठी काही उपक्रमही मनपाकडून राबविले जात आहेत. त्यानुसार एप्रिल महिन्यापासून मनपाने सफाई कर्मचार्‍यांसाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. कामावर असलेली कर्मचार्‍याची उपस्थिती, वेळेत दिलेले काम पूर्ण करणे, तक्रारींचे निरसन करणे, सफाईचे काम उत्कृष्ट पध्दतीने करणे, कामकाज करतांना मनपाच्या वतीने देण्यात आलेल्या स्वसंरक्षणाच्या साधनांचा वापर करणे आदी विविध निकषांद्वारे स्पर्धेत तपासणी करण्यात आली.

प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयातून दर महिन्याला एका कर्मचार्‍याची निवड करण्यात आली. त्यानुसार आठ महिन्यात चार प्रभाग समिती कार्यालयांमधून एकूण 32 कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत सोमवारी होणार्‍या सोहळ्यात उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित केले जाणार आहे.

तसेच शहरातील शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, हॉटेल, हॉस्पिटल व शाळा आदींमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, कचर्‍या विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात या उद्देशाने अशा संस्थांपैकी उत्कृष्ट काम करणार्‍यांचाही गौरव मनपाकडून केला जाणार आहे.

त्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात आली होती. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे, स्वच्छता गृहांची देखभाल, महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, कचर्‍या व बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट, छोटे कंपोस्ट खत प्रकल्प आदींबाबत तपासणी करण्यात आली.

त्यानुसार 12 संस्थांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे पुरस्कार देऊन प्रशस्तीपत्रकाद्वारे गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचा सहभाग वाढणे आवश्यक स्वच्छता विषयक कामकाजात सुधारणा करण्यासाठी मनपाकडून उपाययोजना सुरू आहेत. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी हरित लवादाच्या निर्देशानुसार प्रकल्पांची उभारणी सुरू आहे.

घर ते घर कचरा संकलनासाठी खासगी संस्थेमार्फत नुकतेच काम सुरू करण्यात आले आहे. त्यात येणार्‍या अडचणीही सोडविल्या जात आहेत. मात्र, यात नागरिकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. शहराला कचरामुक्त बनविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. नागरिकांनी इतरत्र कचरा टाकू नये, असे आवाहनही डॉ. अनिल बोरगे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment