पारनेर : तालुक्यातील सुपा (म्हसणे फाटा) एमआयडीसीतील कंपनी व्यवस्थापनाला येणाऱ्या अडचणींसंदर्भात दि.१४ रोजी पारनेर पंचायत समितीचे सभापती दीपक पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट सविस्तर चर्चा केली.
या वेळी सभापतींसमवेत सरपंच संतोष काटे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षांत सुप्याजवळील न्यू फेज म्हसणे फाटा एमआयडीसीसाठी बाबुर्डी, वाघुंडे , पळवे, आपधूप येथील शेतकऱ्यांच्या ३ हजार हेक्टर शेतजमिनी संपादीत करून त्या ठिकाणी नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचे काम सुरू आहे.
तेथे परदेशी कंपन्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. परंतू सदर ठिकाणी तहसीलदार देवरे यांनी कंपनी ठेकेदारांना पूर्वसूचना न देता कंपनीतील कामावरील स्थानिक लोकांचे जेसीबी, डंपर, पोकलॅण्ड, ट्रॅक्टर आदी वाहनांवर दंड आकारणीची नोटीस बजावून काम पूर्णपणे बंद केली आहेत.
सदर वसाहतीत जपानीज इंडस्ट्रीजमधील मायडिया, कॅरियर, मिंडा अशा जागतिक दर्जाच्या कंपन्यांची कामे सुरू आहेत. या कंपनी व्यवस्थापनांचे म्हणणे आहे की, कंपनीचे काम करत असताना स्थानिक लोक तसेच प्रशासकीय पातळीवर देखील आम्हाला मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
हा त्रास पुढेही सुरू राहिल्यास बहुतांश कंपन्या या ठिकाणी येणार नाहीत. पर्यायाने सुपा व परिसराचा विकास होणार नाही. त्यामुळे परिसरातील २० ते २५ हजार तरुणांना रोजगारापासून वंचित राहावे लागेल. या वेळी श्री. पवार यांनी तहसीलदारांनी केलेल्या कारवाईसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून स्वत: लक्ष घालण्यास सांगितले.
तसेच कंपनी प्रशासनास पुन्हा कोणताही त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यास सांगितले तसेच चायनामधील इंड्ट्रिरयल प्रमुख प्रशांत लोखंडे यांच्याशी चर्चा करून त्यांना सुपा एमआयडीसीतील कंपनी व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करण्यास सांगितले व भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची हमी घेतली.
यासंदर्भात लवकरात लवकर स्थानिक आमदार, पदाधिकारी, ठेकेदार, कंपनी व्यवस्थापन, यांची एकत्रीत बैठक घेऊ व मी स्वत: उपस्थित राहून हा प्रश्न सोडवणार असल्याचे शरद पावर यांनी सांगितले.