अहमदनगर :- शहरातील प्रलंबीत उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या आठडाभरातच या कामाचा शुभारंभ होईल, असे समजते. सरकारी पातळीवरच त्यादृष्टीने हिरवा कंदील देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या पातळीवरच हे नियोजन सुरू आहे. शहरातील मोठ्या रहदारीच्या स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपूल गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबीत आहे.
केंद्र सरकारच्या निधीतून आता हा उड्डाणपूल होणार असून या कामाचे उदघाटन येत्या आठवड्यात होईल, अशी माहिती मिळाली आहे.
पुणे रस्त्यावरील यश पॅलेस चौक ते मार्केट यार्ड याऐवजी आता पुणे रस्त्यावरील शिल्पा गार्डन ते थेट औरंगाबाद रस्त्यावरील डीएसपी कार्यालय चौकापर्यंत हा उड्डाणपूल होणार असून त्यासाठी 750 कोटी रूपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
त्यातील शिल्पा गार्डन ते जीपीओ चौक या पहिल्या टप्प्यातील काम हाती घेण्यात येणार असून त्याचाच शुभारंभ येत्या आठवड्यातच होईल. सरकारी पातळीवर त्यादृष्टीने सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
केंद्र सरकारच्या निधीतून उड्डाणपुलाला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गातील दोन रॅम्पसाठी महापालिकेने भुसंपादन करणे गरजेचे होते. मात्र या नपकसान भरपाईच्या कारणावरून मागील काळात चालढकल झाल्याने पुन्हा हे काम रखडले.
आता हा प्रश्नही मार्गी लागला असून त्यासाठी राज्य सरकारने 52 कोटी रूपयांचे स्वतंत्र निधी मंजूर केला आहे. त्यानंतर यातील सर्व अडथळे दूर झाले असून त्यामुळेच आता उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने शुभारंभाची तयारी सुरू आहे, असे सांगण्यात आले.