वृत्तसंस्था :- आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका महिला नेमबाजाने रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र पाठवून ‘निर्भया’ सामूहिक बलात्कार व हत्याकांडातील चारही आरोपींना फाशी देण्याची संधी उपलब्ध करवून देण्याची मागणी केली आहे.
वर्तिका सिंह असे या नेमबाजाचे नाव आहे. त्यांनी आपल्या रक्ताने अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी ‘निर्भया’च्या चारही आरोपींच्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर आपल्या हाताने अंमलबजावणी करण्याची संधी उपलब्ध करवून देण्याची मागणी केली आहे. ‘माझ्या हातात गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेले पत्र आहे.
ते मी माझ्या रक्ताने लिहिले आहे. त्यात मी निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना फाशी देण्याची संधी देण्याची मागणी केली आहे’, असे वर्तिका रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
‘मला परवानगी मिळाली तर देशात महिलांकडे देवीच्या रुपात पाहिले जाते अशी संकल्पना रूढ होईल. विशेषत: भारतात बलात्काऱ्यांना महिला फाशी देतात, असा कठोर संदेशही अवघ्या जगात जाईल. या घटनेमुळे समाजात सकारात्मक बदल होईल’, असे त्या म्हणाल्या.
त्यांनी सर्वच महिला सैनिक, अभिनेत्री, लोकप्रतिनिधी व संघटनांना याप्रकरणी आपले समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतील एका निमवैद्यक शाखेच्या १६ वर्षीय विद्यार्थिनीवर २३ डिसेंबर २०१२ रोजी धावत्या बसमध्ये ६ जणांनी सामूहिक बलात्कार केला होता.
यातील एका अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने ३ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, तर चौघांना नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात फासावर चढवण्याची तयारी सुरू आहे.