अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : राज्यात अवकाळी पावसामुळे ९३ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता २३०० कोटींची तरतूद करणे आवश्यक आहे.
मात्र, राज्य सरकारने केवळ ७५० कोटींची तरतूद अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केली याचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दात निषेध केला आहे.
शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू झाली असून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, यावेळी १६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या आहेत.
४५०० कोटींचा आकस्मिक निधी पूरग्रस्तांच्या बाबतीत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनेने आपल्या जाहिरनाम्यात संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि संपूर्ण सहकार्याचा उल्लेख केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांकरिता २३०० कोटींची मदत जाहीर केल्याची घोषणा करावी.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २३०० कोटी नुकसान भरपाई मिळण्याबाबत भाजपा ठाम असल्याचे ते म्हणाले. सोबतच प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी भाजपाची मागणी असल्याचे फडणवीस सांगितले.