अहमदनगर लाईव्ह 24 टीम / बेलापूर : महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गोळ्या असल्याचे सकाळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. काही वेळातच ही चर्चा सर्वत्र पसरली. हे समजताच स्वत:ला जबाबदार समजणाऱ्या शिक्षकांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.
शिपायाला बोलावून सर्व परिसर स्वच्छ केला व त्या गोळ्या एकत्र करून जाळून टाकल्या. याबाबत गावातील जागृक नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी देविदास चोखर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी समक्ष अधिकारी पाठविला.
खात्री केली असता लोहयुक्त असलेल्या मुदतबाह्य गोळ्या असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत बोलताना आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, जितके विद्यार्थी असतात त्याच प्रमाणात या लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. मग प्रश्न असा पडतो की, शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करते.
पंरतु, शिक्षकाच्या हलगर्जीपणामुळे शासनाचा हा खर्च वाया जातो. शिक्षकाच्या मते ही औषधै मुदतबाह्य झालेली होती, त्यामुळे ती फेकून देण्यात आली.
परंतु, औषधे मुदतबाह्य झाली तर अशाप्रकारे फेकून देणे जबाबदार शिक्षकांना शोभते का जर चुकून एखाद्याने हीच मुदतबाह्य औषधे खाल्ली असेल तर त्याला जबाबदार कोण याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर औषधे मुदतबाह्य झाली असेल तर ती परत केली पाहिजे किंवा त्या औषधांची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे होती.
आता हा सर्व प्रकार पहाता यात अनेकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. शासनाने विद्यार्थ्यांना दिलेल्या गोळ्या विद्यार्थ्यांना का दिल्या गेल्या नाही. २०१५ असे त्या पाकीटावर लिहिलेले होते, तर इतक्या दिवसांपासून ही औषधे का ठेवली गेली हा ही प्रश्न उपस्थित होते.
दरम्यान, महाविद्यालयाच्या इमारतीला रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. तसेच वर्गखोल्यांची व कार्यालयाची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे. साफसफाई दरम्यान ही औषधे बाहेर आली. अन्यथा, ती लक्षातही आली नसती. २०१५ सालाचा उल्लेख असल्याने त्यावेळच्या शिक्षकांनीही याबाबत नव्याने आलेल्या शिक्षकांना माहिती देणे क्रमप्राप्त होते.
त्यामुळे याला कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. मात्र, ही या गोष्टीची चर्चा झाल्याने प्रत्येकजण आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, यासंदर्भात मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.