अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : देशाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज सर्वात अगोदर आपले रक्त सांडण्यास तयार आहे. पूर्वीपासूनच मुस्लिम समाजाने भारत देशासाठी बलिदान दिले आहे. परंतु, सध्याचे भाजपचे नेते मुस्लिम समाजाविरोधात विविध निर्णय घेऊन सत्तेचा दुरूपयोग करीत आहेत.
मुस्लिम समाज नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात असून, देशाला हिंसाचाराच्या खाईत लोटणाऱ्या निर्णयाविरोधात आमचा आवाज दबणार नाही, असा विश्वास राहुरी येथील मुस्लिम बांधवांनी केले.
देशात एनआरसी व सीएबी या विधेयकाला विरोध करण्यासाठी राहुरी तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हातावर काळ्या पट्ट्या बांधून मुस्लिम समाजाने शांतपणे मोर्चा तहसील कार्यालयासमोर आणला.
यावेळी मौलाना अस्लम यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिम समाजाचे योगदान आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज सदैव पुढे राहील. परंतु, समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी एनआरसी व सीएबी हे विधेयक आणले जात आहे. केवळ मुस्लिम समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी आम्ही मोर्चा काढल्याचे मौलाना अस्लम यांनी सांगितले.
निसार सय्यद म्हणाले, देशात अनंत समस्या निर्माण झालेल्या आहेत. लोकांना आजही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या मूलभूत सुविधा मिळत नाही. त्यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना नागरिकत्व देत शासन त्यांना काय देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
उबेद बागवान यांनी मुस्लिम समाजाच्या देशप्रेमावर नेहमीच शंका उपस्थित करणाऱ्या भाजप शासनाच्या निर्णयाविरोधात एकीने लढा देण्याची वेळ आल्याचे सांगितले. सूत्रसंचालन इम्रान देशमुख यांनी केले. प्रास्ताविक निसार सय्यद यांनी केले. इम्रान सय्यद यांनी आभार मानले.