कोपरगाव: चौथीतील मुलीचे अपहरण करून अत्याचार करणारा अमोल अशोक निमसे याला पाचव्या दिवशी सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. सत्र न्यायालयाने त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
पीडित मुलगी सुरेगाव (कोळपेवाडी) येथील शाळेत चौथीत शिकते आहे. १३ डिसेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना आरोपीने खोटी ओळख सांगून तिला शहजापूर-कोळगाव रस्त्यावरील कालव्या लगतच्या निर्मनुष्य वस्तीत असलेल्या बंद खोलीत नेऊन लैंगिक अत्याचार केले.
मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने तिला जबर मारहाण करून जखमी केले. जीवे मारण्याचा दम देत तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, शाळा सुटल्यावर मुलगी घरी न आल्याने घरच्यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अमोल या मुलीस मोटारसायकलीवर बसवून घेऊन गेल्याचे दिसून आले. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या चार पथकांच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या. चार दिवस आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होता.
आरोपीच्या शोधासाठी शहांजापूर,सुरेगाव, पांगरी वडांगळी परिसरातील ओढेनाले, नदी, शेत व डोंगर परिसर पोलिसांनी पालथा घातला. अखेर सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे सदर आरोपी अमोलचा ठावठिकाणा मंगळवारी दुपारी ४ वाजता लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.