अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासे: नगर पंचायतच्या अध्यक्षपदी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या योगिता सतीश पिंपळे व उपनगराध्यक्षपदी विद्यमान उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा बुधवारी दोन मतांनी विजयी झाला. पिंपळे यांनी काँग्रेसच्या शालिनी सुखधान यांचा पराभव केला, तर पाटील यांनी भाजपचे रणजित सोनवणे यांचा पराभव केला.
पुढील अडीच वर्षांसाठी नगर पंचायत कार्यालयात बुधवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सकाळी १० ते १२ दरम्यान उपनगराध्यक्ष पदासाठी क्रांतिकारीकडून नंदकुमार पाटील व भाजपकडून रणजित सोनवणे, सीमा मापारी यांनी अर्ज दाखल केले.
मापारी यांनी माघार घेतल्याने पाटील व सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली. नगराध्यक्षपदासाठी पिंपळे व सुखधान यांच्यात सरळ लढत झाली. हात उंचावून मतदान घेण्यात आले.
क्रांशेपचे नऊ नगरसेवक व भाजप-काँग्रेस गटाचे सात नगरसेवक उपस्थित होते.
भाजपच्या गटातील अपक्ष नगरसेविका अनिता ढोकले अनुपस्थित राहिल्याने क्रांशेपच्या पिंपळे यांना नऊ, तर सुखधान यांना सात मते मिळाली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत पाटील यांना नऊ, तर सोनवणे यांना सात मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व नगर पंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.