कोपरगाव :- मतिमंद मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन सामूहिक अत्याचाराची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती.
या प्रकरणातील माहेगा देशमुख व कुंभारी येथील आरोपी रमेश ऊर्फ पिन्या म्हसू जाधव व किरण ऊर्फ गोट्या भागवत कदम यांना २० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा कोपरगाव येथील सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी सुनावली.
२३ जून २०१७ रोजी रमेश ऊर्फ पिन्या म्हसू जाधव व किरण ऊर्फ गोट्या भागवत कदम यांनी मतिमंद मुलीला व तिच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देत अत्याचार केले.
वारंवार हा प्रकार घडला. पीडित मुलगी गरोदर राहिली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. काद्री यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यासह आठ साक्षीदार तपासण्यात आले.
पीडित मुलगी मतिमंद असल्याने तिची साक्ष नोंदवण्यासाठी नगर येथील मतिमंद मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा महाजन यांची मदत घेण्यात आली.
आरोपींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांची डीएनए तपासणी करून गुन्हा सिद्ध करण्यात आला. मुलीची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून २० वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंडांची शिक्षा ठोठावली.