अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : अकोले तालुक्यातील पंचायत समितीची विनाकारण बदनामी करून अधिकारी व सदस्य यांना वेठीस धरणाऱ्याचे काम जिल्हा परिषदेच्या सदस्य सुषमा दराडे व त्यांचे पती बाजीराव दराडे करत आहेत, असा आरोप असे पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ व सर्व सदस्यांनी केला असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्यावरील आरोपही खोटे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांना दिलेल्या निवेदनात मेंगाळ यांनी म्हटले आहे की, अकोले पंचायत समितीचे कारभारावर जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे व त्यांचे पती बाजीराव दराडे यांनी बदनामी सुरू केली आहे.
तशी वस्तुस्थिती नसून अकोले तालुका पंचायत समितीचा कारभार सुरळीत चालू असून जि. प. सदस्या या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना वेठीस धरले असून त्यांचे पती अधिकाऱ्यांना दमदाटी देऊन खोटेनाटे कामे करावयाला भाग पडतात, न केल्यास त्या कर्मचाऱ्यांना चौकशी व निलंबित करण्याची धमकी देत आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. दराडे यांनी केलेले आरोप धादांत खोटे असून , केळी, रुम्हणवाडी, तिरडे येथील ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी सुरू आहे, तर राजूर,
आंबेवंगण, शेणित, बारी या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवका विरुद्ध दप्तर गहाळ केल्याबद्दल राजूर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर अबितखिंड, पळसुंदे, कोतूळ ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकाविरोधात प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी सभापती मेंगाळ यांच्यासह सदस्य दत्तात्रय देशमुख, दत्ता बोऱ्हाडे, नामदेव आंबरे, देवराम सामेरे, माधवी जगधने, उर्मिला राऊत, अलका अवसारकर, सीताबाई गोंदके, सारिका कडाळी आदी उपस्थित होते.