अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या फाईल परस्पर ठेकेदार माझ्याकडे सह्या घेण्यासाठी येतातच कसे, त्यांचे इतके धाडस कशामुळे होते.संबंधीतांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सार्वजिनिक बांधकाम विभागाला स्थायी समितीच्या सभेत दिले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा काल बुधवारी (दि.१८) झाली. यात काही सदस्यांनी ठेकेदार परस्पर फाईल नेत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर विखे यांनीही पंधरा दिवसापूर्वी माझ्या दालनात असाच एक ठेकेदार परस्पर फाईल घेऊन आल्याचे सांगितले.
हा ठेकेदार कोण ज्याला सार्वजनिक विभागाने फाईल दिली, यावर सार्वजनिक विभाग उत्तरच्या कार्यकारी अभियंत्यांना काहीच उत्तर देता आले नाही. त्यांनी सदर व्यक्ती ठेकेदार नसल्याचे सांगत वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र विखे यांनी मग तो ठेकेदार नाही तर कोण असा सवाल उपस्थित केला.
यावेळी २५ लाखांच्या आतील कामास परवानगी देण्याचे अधिकार कार्यकारी अभियंत्यांना देण्याचा निर्णय झाला. सभेस संदेश कार्ले,अनिल कराळे, सदाशिव पाचपुते, प्रताप शेळके, अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते.